

Maadha accident latest update
माढा: माढा-कुर्डुवाडी रस्त्यावर गुरूवारी (दि.७) सकाळी एका एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या दुर्दैवी घटनेत स्कॉर्पिओमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, बस आणि स्कॉर्पिओमधील एकूण १५ जण जखमी झाले आहेत.
माढ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील वळणावर सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीतील संजय छगन हुबाले (वय ५०, रा. उपळाई बुद्रुक) यांचा मृत्यू झाला, तर यशवंत संतोष बेडगे (वय २२, रा. उपळाई बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैरागहून बोरीवलीकडे जाणारी एसटी बस (क्र. एम.एच. १४ बी.टी. ४३७४) कुर्डुवाडीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी समोरून, कुर्डुवाडीहून माढ्याच्या दिशेने एक स्कॉर्पिओ गाडी (क्र. एम.एच. ४५ ए.यु. ७२९६) येत होती. पेट्रोल पंपाजवळील वळणावर स्कॉर्पिओ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओ गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्कॉर्पिओमधील संजय हुबाले आणि यशवंत बेडगे यांना तातडीने मस्के हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच संजय हुबाले यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या अपघातात एसटी बसमधील १४ प्रवाशांनाही दुखापत झाली असून, त्यापैकी तिघांना जबर मार लागला आहे. सर्व जखमींना माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवाजी मनोहर सुतार (वय ७५, रा. सुर्डी, ता. बार्शी), सिंधु पांडुरंग केसरे (वय ६०, रा. इर्ले, ता. बार्शी), काशीबाई अर्जुन भड (वय ६५, रा. गौडगाव, ता. बार्शी, सारिका सिद्धेश्वर मोहिते (वय ३५, रा. इर्लेवाडी, ता. बार्शी), पार्वती दादाराव भोसले (वय ७७, रा. काटी, ता. तुळजापूर), स्वाती मारुती खर्चे (वय ३२, रा. माढा), दत्तात्रय उद्धव व्यवहारे (वय ४५, रा. माढा), महादेव विश्वनाथ माळी (वय ३०, रा. सुर्डी), उषा देविदास चव्हाण (वय ३५, रा. फुरसुंगी, पुणे), नवनाथ भिकाजी कापसे (वय ७६, रा. कापसेवाडी), लहू ज्ञानदेव लोंढे (वय ७७, रा. उपळाई बुद्रुक), जनाबाई लहू लोंढे (वय ७०, रा. उपळाई बुद्रुक), भीमराव सोनवणे (वय ६७, रा. देवळाली, ता. मोहोळ आणि वैशाली योगेश पवार (वय ३३, रा. कापसेवाडी) अशी एसटी बसमधील जखमी प्रवाशांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच माढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, एसटी डेपोच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमधून त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले. या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास माढा पोलीस करत आहेत.