

सोलापूर ः जिल्ह्यात अडीच हजार जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यातील दोन हजार 127 जनावरे उपचारांमुळे बरी झाली आहेत. 244 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर 71 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 17 जनावरे ही पंढरपूर तालुक्यातील आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील लम्पीचा प्रकोप कमी होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण, वेळीच उपचार आणि लम्पी आजाराची जनजागृती केल्यामुळे लम्पी आजार आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. सध्या अक्कलकोट तालुक्यात 21, बार्शीत 1, करमाळ्यात 18, माढा येथे 26, माळशिरस तालुक्यात 53, मंगळवेढा येथे 27, मोहोळ 9, पंढरपुरात 46, सांगोला 20, उत्तर सोलापूर येथे 8 आणि दक्षिण सोलापूर येथे 15 लम्पीबाधित जनावरांवर उपचार सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील 80 टक्के जनावरांना लम्पी आजाराचे लसीकरण केले होते. मात्र, उर्वरित जनावरांना लसीकरण बाकी होते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून लस खरेदी करून तत्काळ वितरण केले आहे. त्यामुळे उर्वरित 20 टक्के जनावरांना वेगाने लसीकरण होत आहे.
अक्कलकोट तालुक्यात 5, बार्शीत 00, करमाळ्यात 10, माढा येथे 3, माळशिरस तालुक्यात 13, मंगळवेढा येथे 10, मोहोळ 1, पंढरपुरात 17, सांगोला 5, उत्तर सोलापूर येथे 3 आणि दक्षिण सोलापूर येथे 4 असे एकूण 71 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे.