

सोलापूर : मागील काही वर्षांपासून कृषी विभागाच्या क्षेत्रात बदल होत असतानाच अनेक योजना आणल्या आहेत. या योजनेतील साहित्य, अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काढल्या जाणार्या लकी ड्रॉ पद्धत आता बंद करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लाभ मिळणार आहे. त्यामुळे जे प्रथम अर्ज भरतील अशा शेतकर्यांना कृषी विभागाचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने कृषी यांत्रिकीकरण योजना, फळबाग योजना, पीक प्रात्यक्षिक योजना, सूक्ष्म सिंचन योजना यासह अन्य योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी शासनाच्यावतीने अनुदान रूपात मदत दिली जाते. कृषी योजनांमध्ये प्रथम येईल त्याला प्राधान्य या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना त्वरित लाभ मिळण्याची संधी मिळणार आहे. अर्ज केलेल्या शेतकर्यांमध्ये प्रथम अर्ज करणार्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
लकी ड्रॉची काढण्यात अधिक वेळ लागायचा. महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्यांनी अर्ज केल्यानंतर निवडक लाभार्थ्यांची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून केली जात होती. अनेक शेतकर्यांना या पद्धतीने अनुदान मिळण्याची संधी न मिळाल्यामुळे तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे लाभार्थी निवड पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
सर्वप्रथम अर्ज करणारेच लाभार्थी
शेतकर्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या लकी ड्रॉ योजना आणि निवड प्रक्रियेमध्ये शेतकर्यांना लाभ मिळवण्यासाठी अनेक वेळा अर्ज करावे लागले. प्रत्येक वेळी निवडीसाठी परत परत सोडत काढावी लागायची. आता मात्र सर्वप्रथम अर्ज करणार्या शेतकर्यांची लाभार्थी म्हणून निवडण्यात येतील.