

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला गॅस पुरवठा करणाऱ्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल कंपनीच्या सेल्स अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील घरगुती व्यवसायिक एलपीजी गॅस वितरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एलपीजी गॅस पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असून वितरण ही सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात एलपीजी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री, रघुकुमार तसेच सेल्स अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्ह्यातील घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस वितरणाचा सविस्तर आढावा घेतला.
केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडर वाटपाचे अधिकार राज्य शासनास दिल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या दिनांक 8 एप्रिल 2026 च्या आदेशानुसार व्यावसायिक सिलेंडर वाटपासाठी 70 टक्के मर्यादा निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधित कंपन्यांनी गॅस पुरवठा सुरू केला असून, ज्यांच्याकडे व्यावसायिक कनेक्शन नाही त्यांनी जवळच्या गॅस एजन्सीकडे नोंदणी करावी, असे सांगण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून अखाती युद्धविरामानंतर गॅस वितरणाची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे हॉटेल व इतर व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. 08 एप्रिल 2026 च्या सूचनेनुसार सर्व गॅस एजन्सींना खालील सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गॅस एजन्सी किंवा गोदामातून थेट सिलेंडर विक्री करण्यात येणार नाही. सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच पुरविण्यात येतील. ग्राहकांनी एजन्सी किंवा गोदामासमोर रांगा लावू नयेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.