

सोलापूर : वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 165 शाळेतील शिक्षकांचे समायोजन होणार आहे. त्याठिकाणी कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे.
पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे. शिक्षकांचे पद निश्चित करण्याचा अधिकार शासनाला आहे. मात्र अतिरिक्त शिक्षकांना सेवेतून कमी न करता त्यांना जवळच्या शाळेत समायोजन करावे, असे आदेश अलिकडे न्यायालयाने दिले आहेत. तसेच दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे.
15 मार्च 2024 ची संचमान्यता उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे आता दहापेक्षा कमी पटाच्या शाळेतील प्रत्येक वर्गावर एक कंत्राटी शिक्षक दिला जाणार आहे. तर 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, राज्यातील कमी पटाच्या 18 हजार 106 शाळा आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 165 आणि खासगी अनुदानित प्राथमिक सुमारे 50 शाळा आहेत. त्या सर्व शाळेतील शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन होणार आहे.