

सोलापूर : राज्य शासनाने येत्या 30 जून 2026 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने आता जुनं नवं करून कर्जखाती नियमित ठेवणारे कर्जदार शेतकरीही आता थकबाकीदार होण्याची शक्यता असल्याने पुन्हा बँका अडचणीत येणार आहे.
नुकतेच बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन येत्या 30 जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले. कर्जमाफी कशी लागू करायची आणि निकष काय असतील, याबाबत अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती समिती नेमण्यात आली आहे. प्रवीणसिंह परदेशी हे या समितीचे अध्यक्ष असून ही समिती आपला अहवाल एप्रिल 2026 पर्यंत आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहेत. त्यानंतर निर्णय होणार आहे.
दरम्यान, कर्जमाफीच्या निर्णयाची चर्चा शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे. केवळ थकबाकीदारांनाच कर्जमाफी मिळत असल्याने चालू वर्षातील कर्ज थकीत राहण्याची शक्यता आहे. यामुळेच बँकांना कर्ज वसुलीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.