

सोलापूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गंत संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ चालवले जाते. या महामंडळाकडून राज्यातील चर्मकार समाजासह अन्य अनुसूचित जातीतील तरुणांना विविध उद्योग, व्यवसायासाठी अर्थसहाय्य आणि अनुदान मिळते. पुर्वी अडीच लाखांची कर्ज मर्यादा होती, त्यात वाढ करून ही मर्यादा आता पाच लाखांपर्यंत केली आहे. या महामंडळाच्या लाभार्थ्याना पुढील काळात पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासह मोची, ढोर व होलार यासह अन्य अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींना व्यवसाय उद्योग उभारणी करताना बँका वित्तीय संस्था कर्ज देतांना विचार करतात, हात आखडता घेतात. बर्याच वेळा निराशही यांच्या पदरी पडते. तेव्हा, होतकरू तरुणांना व्यवसायाचे स्वप्न सोडून द्यावे लागत होते. यावर शासनाने महामंडळ व केंद्रीय महामंडळाच्या सहयोगातून चर्मकार समाजातील युवक व युवतींना अर्थबळ देण्यासाठी मुदत कर्ज योजना सुरू केली. यात प्रकल्प मर्यादाही वाढवली असून ती अडीच लाखांवरून पाच लाख केलेली आहे. याचा फायदा तरूणांना मिळणार आहे.
या योजनेच्या अर्थबळात वाढ करण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतल्याचा फायदा उद्योग उभारू पाहणार्यांना होऊ शकतो. तसेच, अनुदानाच्या रकमेतही वाढ केली असून ते पन्नास हजार रुपये केला आहे. शिवाय, थेट महामंडळाकडून कर्ज देण्याची योजनाही अंमलात आणली आहे. वाढलेल्या कर्ज मर्यादेचा फायदा उपेक्षित घटकाला होणार आहे. कर्जाच्या मर्यादेत अडीच लाखांनी वाढवल्याचा फायदा छोटे व्यावसायिक घेतील. पण, मोठ्या उद्योगांसाठी ही रक्कम तोकडी आहे. गत वर्षी या योजनेतून साधारण साडे पाच हजाराहून अधिक लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेण्यात आले होते. यंदा त्यात वाढ झाली आहे. याचा फायदा तरूणांना मिळणार आहे.