चैतन्यमय नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

घटस्थापना दुपारी 12 वाजता; यंदा दहा दिवसांचा महोत्सव
navratra Utsav
तुळजापूर ः शक्तिदेवता श्री तुळजाभवानीची बुधवारी बांधण्यात आलेली आकर्षक सालंकृत पूजा.Pudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर ः संजय कुलकर्णी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी शक्तिदेवता श्री तुळजाभवानीमातेच्या शारदीय नवरात्रौत्सवाला गुरुवारी (दि. 3) दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. गेल्या मंगळवारी (दि. 24) भाद्रपद कृष्ण अष्टमीला सायंकाळी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा आश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे संपुष्टात येणार आहे. नऊ निद्रा पूर्ण करून दहाव्या दिवशी मातेची मुख्य मूर्ती सिंहासनाधिष्ठित केली जाणार असून बुधवारी मूर्तीला दोन वेळा पंचामृत अभिषेक पार पडला. आज दुपारी बारा वाजता मातेची शोड्षोपचार पूजा, नैवेद्य, धुपारती-अंगारा सोहळा पार पडल्यानंतर सिंह गाभार्‍यात विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. यंदा नवरात्रौत्सव दहा दिवस असणार आहे. या मुख्य सोहळ्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरातील परिवार देवता म्हणून ओळखल्या जाणार्‍या आदिमाया आदिशक्ती देवी, मातंगी देवी, यमाई देवी, जेजुरी खंडोबा, लक्ष्मी-नृसिंह मंदिरातही घटस्थापनेचा विधी पार पडणार आहे.

navratra Utsav
शारदीय नवरात्रौत्सवास उद्यापासून सुरूवात; अशी करा घटस्थापना

घटस्थापनेला मूर्तीची त्रिकाल पूजा तुळजाभवानी मातेच्या निद्रिस्त मूर्तीला गुरुवारी पहाटे सिंहासनाधिष्ठीत करण्यापूर्वी पलंगावरच चरणतीर्थ पार पडणार आहे. मंदिर संस्थानच्या वतीने यावेळी मातेची आरती होईल. मुख्य पुजार्‍यांकडूनही यावेळी मानाच्या आरत्या पार पडल्यानंतर मातेला जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा लावला जातो. या धार्मिक विधीनंतर निर्माल्य विसर्जन होते. त्यानंतर देवीच्या पूजेची घाट देऊन मुख्य मूर्ती चांदीच्या पलंगावरून हलवून सिंहासनाधिष्ठीत केली जाते. मूर्ती सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर पुन्हा मुख्य पुजार्‍यांकरवी मातेला आरत्या ओवाळून देवीची द़ृष्ट काढली जाते. त्यानंतर मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू होऊन सूर्योदयापूर्वी मातेची शोड्षोपचार पूजा नैवेद्य, धुपारती, अंगारा पार पडतो. पुन्हा सकाळी सहा वाजता मातेच्या नित्य पूजेची घाट दिली जाते. त्यानंतर मूर्तीला दुसर्‍यांदा पंचामृत अभिषेक सुरू होतो. हे अभिषेक सकाळी दहा वाजेपर्यंत चालतात. मूर्तीला भाळी चंदनाचा मळवट चोपून, भरजरी वस्त्रे परिधान केली जातात. हिरे, माणिक, मोत्यांच्या दागदागिन्यांचा साज चढविण्यात येतो. त्यानंतर पुन्हा नैवेद्य, धुपारती, अंगारा काढण्यात येतो. सायंकाळीही याच पद्धतीने मातेच्या पूजेचा विधी पार पाडतो. अशा रितीने घटस्थापनेदिनी मातेची त्रिकाल पूजा पार पडते.

ज्योत नेण्यासाठी भक्तांची झुंबडबुधवार, गुरुवारी दिवसभर घटस्थापनेसाठी भवानी ज्योत घराकडे घेऊन जाण्यासाठी राज्यासह, परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली आहे. मराठी, तेलगू, कन्नड भाषिक लाखो भाविकांनी मातेची मुख्य मूर्ती पलंगावर निद्रिस्त असतानाच दर्शनासाठी गर्दी केली. बुधवारी घटासाठी श्रीफळ, कवड्यांची नवी माळ, पोत, परडी घेण्यासाठी आणि घटस्थापनेसाठी भवानी ज्योत घराकडे नेण्यासाठी गर्दी उसळली आहे. घटासाठी श्रीफळ व आईच्या दरबारात प्रज्वलित केलेल्या ज्योतीला अधिक महत्त्व असून ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे.

navratra Utsav
Navratra in Maharashtra दिवस पहिला : नवरात्रौत्सवास प्रारंभ; विविध मंदिरातील पूजा (Photo)

आई राजा उदो उदोचा जयघोष

दरम्यान, बुधवारी सर्वपित्री अमावस्येला तुळजापूरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. तुळजापूर नगरी ढोल ताशांचा दणदणाट व आई राजा उदो उदोच्या जयघोषाने अक्षरशः दुमदुमून गेल्याचे दिसून आले.

छत्रपतींच्या घराण्यांचा मातेला गुरुवारी साज

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला विविध कलाकुसरीचे दागदागिने आहेत. ज्या दागिन्यांचे मोल, तुलना कुठल्याच दगिन्यांशी होऊ शकणार नाही. मात्र शारदीय नवरात्रोत्सवातील पाहिल्या माळेला मातेच्या मुख्य मूर्तीला छत्रपतींच्या घराण्यांकडून अर्पण झालेल्या दागदागिन्यांचा साज चढविण्यात येतो. दागिन्यांच्या एकूण सात पेट्यांपैकी क्रमांक एकच्या पेटीचा दर्जा या दागिन्यांना देण्यात आला आहे. या दागिन्यांच्या वेशात मातेची मुख्य मूर्ती अत्यंत शोभून दिसते. यावेळी पुजार्‍यांकरवी मातेची दृष्ट काढली जाते. मंदिरातील भाविकांची गर्दी कमी करण्याचे व्यवस्थित नियोजन नसल्याने मातंगी मंदिराकडून येताना भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मातेचे दोन्ही मुख्य महाद्वार उघडे असूनही भाविकांना घाटशीळ मार्गाकडून मंदिरात सोडण्यात येणार आहे.

navratra Utsav
घटस्थापना : घटस्थापनेने नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

दोन दिवसांत तीन लाखांहून भाविक झाले नतमस्तक

गेल्या दोन दिवसांत किमान तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवी दर्शनाचा लाभ घेतला. श्री तुळजाभवानी मातेचा दर्शन मंडप भाविकांनी फुलला आहे. असंख्य भाविकांना दर्शन मंडपात जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. धर्म, मुख व अभिषेक दर्शन अशा विविध मार्गांनी भाविक शिस्तीत दर्शनाचा लाभ घेत आहेत. देवीसमोर जाण्यासाठी भाविकांना बुधवारी सायंकाळी किमान दोन तासांचा अवधी लागला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news