Liquor Ban | तीर्थक्षेत्र वडवळ येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर; अवैध दारू व्यावसायिक करणार दुसरा व्यवसाय

Mohol News | अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी उत्तम व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
Vadval village liquor ban
श्री क्षेत्र वडवळ येथील ग्रामसभेत दारूबंदीसह विविध ठरावाला ग्रामस्यांमधून उत्फूर्त पाठिंबा मिळाला. Pudhari
Published on
Updated on

Mohol Vadval village liquor ban

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील श्री क्षेत्र वडवळ येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी यापुढे उत्तम व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

गेल्या काही वर्षात वडवळ गावातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं. दारूमुळे गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होऊन व्यसनी तरुणांमुळे गावाची प्रतिमा मलिन झाली होती. शाळकरी मुलांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम दिसू लागल्याने गावातील काही तरुणांनी गावात दारूबंदी करण्याचा निर्धार केला.

दारूबंदीसाठी वेळोवेळी विविध बैठका घेऊन तरूणांनी नियोजन केले. १५ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी विशेष बैठक घेऊन या बैठकीत गावात दारूबंदी करण्यावर सर्वांचे एकमत झाले. ग्रामसभा घेऊन त्यात दारूबंदीचा ठराव मांडण्याचे ठरले. ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामसभेला आवश्यक असणारी गणपूर्ती झाली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बापूसाहेब दळवे यांनी केले. ग्रामविकास अधिकारी सचिन वसेकर यांनी अहवाल वाचन केले.

आजच्या ग्रामसभेत लोकसेवा हक्क हमी कायदा अंमलबजावणी, बालविवाह कायदा जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजना मंजूर घरकुल आढावा, ग्रामपंचायत कर वसुली, वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी लाभार्थी निवडणे, विविध योजनेतून विकास कामांचे प्रस्ताव सादर करणे या विषयानंतर दारूबंदीचा ठराव मांडला. ठरावाला उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी हात उंचावून व टाळ्यांच्या गजरात पूर्ण पाठिंबा दिला. यापूर्वी गावात अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी यापुढे उत्तम व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. गावातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या तरुण मंडळांनी व्यसनमुक्तीच्या या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार केला.

ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाणंद रस्ते दुरुस्ती, गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन, स्मशानभूमी सुधारणा, हुतात्मा स्मारक स्वच्छता, रस्त्यावरील वाढते अतिक्रमण, मंदिरासमोरील स्वागत कमान, वडाचे झाड सुशोभीकरण, गटार स्वच्छता व फवारणी असे विविध विषय मांडले. सर्व विषयांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व कामे मार्गी लावण्याचे वचन दिले.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जालिंदर बनसोडे होते.यावेळी माजी सरपंच सुरेश शिवपुजे,राहुल मोरे,शाहिर मोरे,शाहू धनवे, हरिदास पवार,धनाजी चव्हाण,शाहिर पवार ,लक्ष्मण मळगे,दादासाहेब काकडे-पाटील, श्रीकांत शिवपुजे, भारत गुंड, नामदेव पवार, सैनिक दिपक मुळे, भिमराव मोरे, नानासाहेब मोरे, मनोज मोरे, धनंजय पवार, विजय काळे, संजीवनी लंबे, सविता पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरज धनवे यांनी सर्वांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news