Reading Inspiration Day : नागरिकांना सुसंस्कृत बनविणाऱ्या ज्ञानदीप उजळवणाऱ्यांचे आयुष्य अंधारातच

वाचन प्रेरणा दिन विशेष
Library
LibraryPudhari
Published on: 
Updated on: 
अमोल साळुंके

​सोलापूर : अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस (१५ ऑक्टोबर) हा राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करत असतानाच महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये तुटपुंज्या वेतनावर काम करत असल्‍याने ज्ञानदीप उजळवणाऱ्यांचे आयुष्य अंधारातच असल्‍याचे चित्र राज्‍यभर दिसत आहे.

प्रामाणिकपणे ग्रंथालयाची सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने किमान वेतन लागू करावे, तरच डॉ. कलाम यांच्या आदर्शांचे खरे सार्थक होईल, असे मत ग्रंथालय कर्मचाऱ्यांतून व्‍यक्‍त होत आहे.

डॉ. अब्दुल कलाम यांनी कोणतीही कौटुंबिक वा आर्थिक पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, ज्ञान आणि वाचनाच्या बळावर देशातील सर्वोच्च पद भूषवले. वाचनामुळे माणसाची प्रगल्भता वाढते आणि विचारांना दिशा मिळते. समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि विद्यार्थी व नागरिकांना सुसंस्कृत बनवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी अहोरात्र कष्ट करत आहेत. ​

महागाईच्‍या काळात जगायचं कसं

महागाईच्या काळातही ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. कष्टाचे मोल न मिळल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समाजाचा बौद्धिक व सांस्कृतिक पाया मजबूत करणाऱ्या या घटकाला त्यांचे हक्क मिळणे अत्यंत आवश्यक असल्‍याचे मत ग्रंथालय कर्मचाऱ्यांतून व्‍यक्‍त होत आहे.

शासन एकीकडे वाचन संस्कृतीच्या जतनासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु, ही संस्कृती घराघरांत पोहोचवणाऱ्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे आयुष्य अंधारात राहू नये. शासनाने या कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वेतन देऊन डॉ. कलाम यांच्या विचारांना आणि कार्याला खरा न्याय द्यावा.
- सदाशिव बेडगे, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news