

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील अखेरचा आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या चिन्ह वाटपाची प्रक्रिया शनिवारी पार पडली. या प्रक्रियेत अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे अधिकृत वाटप करण्यात आले. यामुळे आता निवडणूक रणधुमाळीला वेग आला. चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, काही चिन्हांमुळे गमती-जमतींचे प्रसंगही पाहायला मिळाले. रविवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल.
अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या चिन्हांमध्ये मोठी विविधता दिसून आली. कुणाला टोपली, कुणाला सीलिंग फॅन, कुणाला पांगुळगाडा, तर कुणाला रोड रोलर असे अनोखे चिन्ह मिळाले. याशिवाय काही उमेदवारांच्या वाट्याला एसी, बॅट, टेबल, खुर्ची यांसारखी दैनंदिन वापरातील चिन्हे आली. ही चिन्हे पाहून उमेदवारांसह उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आले. चिन्ह हे केवळ ओळखीचे माध्यम नसून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन मानले जाते.
दरम्यान, काही उमेदवारांनी आपल्याला मिळालेल्या चिन्हाचा प्रचारात कल्पकतेने वापर करण्याची तयारीही सुरू केली आहे. बॅट मिळालेल्या उमेदवाराने ‘विकासासाठी बॅटिंग’चा नारा दिला असून, रोड रोलर मिळालेल्या उमेदवाराने ‘भ्रष्टाचारावर रोड रोलर फिरवू’ अशी भूमिका जाहीर केली आहे. एसी चिन्ह मिळालेले एसीच्या थंडगार वाऱ्यात बसून सर्वांना आपण पुन्हा चटके देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, शनिवारी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली. नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षांची अधिकृत चिन्हे देण्यात आली. अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेली विविध मुक्त चिन्हे वाटप करण्यात आली. बंडखोर उमेदवारांनाही स्वतंत्र चिन्हे देण्यात आल्याने अनेक प्रभागांत नवीन राजकीय चर्चा आणि गणिते रंगू लागली आहेत. यावेळी काही प्रभागांमध्ये चिन्हांवरून उत्सुकता व कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळाले. काही चिन्हे पारंपरिक ओळखीची असल्याने मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली, तर काही अनोख्या चिन्हांमुळे प्रचारात वेगळेपण दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- महापालिका निवडणुकीत अंतिम 564 उमेदवार रिंगणात
- नॉर्थकोर्ट प्रशाला येथे चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली
- पक्षीय उमेदवारांना अधिकृत, अपक्षांना मुक्त चिन्हे
- बंडखोर उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत चुरस वाढली
- चिन्ह वाटपानंतर प्रचाराला अधिकृत सुरुवात
कोणाला कोणते चिन्ह मिळाले?
प्रभाग 3 मध्ये बाबुराव जमादार (टीव्ही), प्रभाग 5 मध्ये राजू अलुरे (ऑटो रिक्षा), शितल झाडगे (कपाट), प्रभाग 6 मध्ये मनोहर सपाटे (टोपली), रेखा गायकवाड (पांगुळ गाडा), प्रभाग 9 मध्ये अरविंद शिंदे (शिलाई मशीन), प्रभाग 10 मध्ये विठ्ठल कोटा (गॅस सिलेंडर), प्रभाग 21 मध्ये अमित अजनाळकर (बॅट), प्रभाग 22 मध्ये शीतल गायकवाड (फुगा), प्रभाग 23 मध्ये नवनाथ भजनावळे (रोड रोलर), प्रभाग 24 मध्ये शैलजा राठोड (सिलिंग फॅन), रश्मी विशाल गायकवाड (फुगा), प्रभाग 26 मध्ये राजेश काळे (ए.सी), श्रीहरी हिरेमठ (पांगुळ गाडा), अरुण मोरे (कपाट) यासह इतर अपक्ष उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली.
दाखल उमेदवारी अर्ज : 1460
वैध नामनिर्देशित उमेदवार : 1096
अर्ज मागे घेतलेले उमेदवार : 532
अंतिम निवडणूक लढविणारे उमेदवार : 564
आजपासून प्रचाराची रणधुमाळी
महापालिका निवडणुकीसाठी साधारणतः 10 दिवस प्रचारासाठी राहणार आहेत. दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार मुदत राहणार आहे. यादरम्यान प्रचाराची रणधुमाळी जोरात राहणार आहे. मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशीच 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. दि. 19 जानेवारीपर्यंत निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांनी मिळालेली चिन्हे
- भारतीय जनता पार्टी : कमळ
- भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) : हातोडा विळा आणि तारा
- बहुजन समाज पार्टी : हत्ती
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : हात
- आम आदमी पार्टी : झाडू
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : घड्याळ
- शिवसेना : धनुष्यबाण
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मशाल
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : तुतारी वाजवणारा माणूस
राज्यस्तरीय पक्षांना मिळालेली चिन्हे
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष : कणीस आणि विळा
- जनता दल सेक्युलर : डोक्यावर भारा घेतलेली स्त्री
- समाजवादी पार्टी : सायकल
- इंडियन युनियन मुस्लिम लीग : शिडी
- ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम : दोन पाने
- जनता दल (युनायटेड) : बाण
- ऑल इंडिया मजलीस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) : पतंग
- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक : सिंह
- भारत राष्ट्र समिती : कार
मुक्त चिन्हे
एअर कंडिशन, कपाट, सफरचंद, ऑटो रिक्षा, फुगा, पांगुळ गाडा, टोपली, डंबेल्स, फुटबॉल, काटा चमचा, कारंजे, टेनिस रॅकेट, फ्रिज, अंगठी, रोड रोलर, रबरी शिक्का, करवत यासह अन्य एकूण 194 चिन्हांचा समावेश आहे.