

मोडनिंब : माढा तालुक्यातील अरण परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा दिसून आले. मंगळवार दि.29 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाधववाडी हद्दीतील लहू लक्ष्मण सुर्वे यांच्या शेतालील देशी गाईच्या वासरावर झडप घालून ठार मारले.गेल्या महिनाभरापासून बिबट्या माढा तालुक्यातील आपला मुक्काम सोडायला तयार नाही.
सोमवार (दि.28 जुलै) रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास अरणगांवातील शेळके, गाजरे वस्तीवर विष्णू गाजरे यांना द्राक्षबागेत फवारताना 25 ते 30 फुटावरती बिबट्या दिसून आला. विष्णू गाजरे यांनी बिबट्यास बघताच त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी सुरू केली आणि दुचाकीचा रेस वाढवून मोठा आवाज केला. या आवाजाने बिबट्या तेथून पळून गेला. तर संग्राम गाजरे यांना दळण घेऊन येताना बिबट्याने दर्शन दिले. त्या पूर्वी 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता सर्जेराव सावंत यांच्या जर्सी गाईचे वासरूही ठार मारले. तेथून बिबट्या गाजरे, शेळके वस्तीवर आला. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थ तेथे काठ्या व बॅटरी घेऊन जमा झाले.
अन्य एका घटनेत जनावरांच्या ओरडण्याने व कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने बिंनगे कुटुंबिय जागे झाले. ते बाहेर आल्यानंतर त्यांनी तेथे मोठमोठ्याने आवाज दिल्याने बिबट्या तेथून पळून गेला.यामुळे पुढील अनर्थ टळला.या संपूर्ण परिसराला वनपाल बाबासाहेब लटके, वनसेवक विकास डोके, संभाजी जगताप,अविनाश गायकवाड, शुभम दहायतडक, बापु वाघमोडे यांच्या पथकाने घटनेच्या दोन्ही ठिकाणी भेट दिली. बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले.
दोन दिवस झाले अरण व जाधववाडी या भागात बिबट्याचे जनावरांवरती हल्ले सुरू आहेत. या परिसरात फळबागा व ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्याला दडून बसण्यास ठिकाणे सापडतात. रात्र होताच तो शिकारीसाठी बाहेर पडतो आहे. त्यामूळे परिसरात घबराहटीचे वातावरण आहे.