

सोलापूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पाच वर्षांच्या बी.ए. एलएल.बी. आणि तीन वर्षांच्या एलएल.बी. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड 3 ची प्रक्रिया सुरू केली आहे, यामुळे विधी प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कॅप राऊंडनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. महाविद्यालयांमध्ये भावी वकिलांचे धडे 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाच वर्षांच्या बी.ए.एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी कॅप राऊंड 3 ची प्रक्रिया दि. 23 ऑगस्ट पर्यंत होती. पदवीनंतरच्या तीन वर्षांच्या एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी ही प्रक्रिया आजपासून दि. 24 ते 27 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे; पण नोंदणी करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दोन हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने एप्रिल-मे महिन्यात विधी अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली होती. सोलापूर जिल्ह्यातून सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, आता ते कॅप राऊंडद्वारे प्रवेशाची वाट पाहत आहेत. प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल.
महाविद्यालयातील प्रवेश क्षमता
या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात चार नवीन विधी महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण विधी महाविद्यालयांची संख्या सात झाली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये एलएल.बी., बीए. एलएल.बी., एलएलएम या अभ्यासक्रमांसाठी एकूण 480 जागा उपलब्ध आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अधिक संधी मिळेल.