

अक्कलकोट : ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू, श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या घोषात लाखो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ महाराज मंदिरात प्रकट दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रकट दिनानिमित्त गाभाऱ्यासह मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
वटवृक्ष मंदिरासह बुधवार पेठेतील स्वामी समर्थ समाधी मठ, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्री गुरु मंदिर, श्री राजेराय मठ, शिवपुरी यज्ञनगरी, श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम बागेहळ्ळी, श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम ट्रस्ट या ठिकाणीही धार्मिक कार्यक्रम झाले.
पहाटे चार वाजता श्री स्वामींची पालखी प्रदक्षिणा शहरातून मार्गक्रमण करीत मंदिरात विसावली. पहाटे पाच वाजता काकड आरती नंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनाकरिता मोठी रांग लागली होती. भर उन्हातही हजारो स्वामी भक्तांची गर्दी कायम होती. ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परगाहून आलेल्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन बारीमध्ये मंडप उभार ला होता. पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.