

कुर्डूवाडी : अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश असलेल्या कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊ लागला आहे. त्यामुळे नववर्षात कुर्डूवाडीसह परिसरातील प्रवाशांना एप्रिलपर्यंत सुसज्ज स्थानकाची भेट मिळणार आहे. एकूण पाच प्लॅटफॉर्म असलेले हे स्थानक विभागातील मोठे स्थानक ठरणार आहे.
रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, बुकिंग ऑफिस, प्रवाशी पार्किंग व्यवस्था, लोहमार्ग पोलीस स्टेशन, विविध युनियनची कार्यालये, रेल्वे स्टाफ पार्किंग, आकर्षित विद्युत रोषणाई, अंतर्गत रस्ते, सुरक्षा भिंती यासह इतर गोष्टींचा समावेश असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे कुर्डूवाडी शहराच्या वैभवात भर पडणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेत पहिल्या टप्प्यात कुर्डूवाडी, जेऊर व दौंड रेल्वे र्सैथानकाच्या नियोजित विविध कामांसाठी रेल्वेकडून तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर त्याच्या क्लस्टर टेंडरमधून येथील स्टेशनवरील विविध विभागांच्या बांधकामाचे काम सुरू झालेे.ते आता जवळपास 85 टक्के पूर्ण झाले आहे. या कामांत प्रवाशांकरिता अनेक सुख सुविधांचा समावेश आहे.
कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन हे ब्रिटिश काळापासून कार्यरत असणारे सर्वात जूने रेल्वे स्टेशन व महत्वाचे जंक्शन आहे. सुरुवातीच्या काळात येथील स्टेशनचे नाव हे बार्शी रोड स्टेशन होते.त्यानंतर ते बदलून कुर्डूवाडी स्टेशन झाले. कुर्डूवाडी जंक्शन हे मराठवाड्याचे रेल्वेचे प्रवेशद्वार असून पूर्वीपासून या ठिकाणावरून मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव यासह सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रवासीही येथून मुंबई, पुणे, मिरज, पंढरपूर,कोल्हापूर तर दक्षिणेकडे चेन्नई, कन्याकुमारी, तिरुपती तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी देखील येथून नागपूर, नांदेड, लातूर,भोपाळ व दिल्ली या ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे येथील रेल्वे जंक्शनला पूर्वीपासूनच अन्यन्यसाधारण महत्व आहे.
येथून पंढरपरला जाणार्या विशेष रेल्वे गाड्यांमुळे देवाच्या गाडीचे स्टेशन म्हणूनही या जंक्शनचा संपूर्ण राज्य व देशात विशेष उल्लेख केला जातो. पहिल्या टप्प्यातील संपूर्ण नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर दुसर्या टप्प्यातही कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे भविष्यात कुर्डूवाडी जंक्शनला आगळे वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. यासाठी रेल्वेकडील विविध विभागाचे अधिकारी व ठेकेदारी विभागातील अनेक कर्मचारी परिश्रम घेत आहेत. पहिल्या टप्प्यात स्टेशनच्या मुख्य इमारतीतील फर्निचर, टॉयलेट ब्लॉक, वेटिंग हॉलचं डेव्हलपमेंट, लिफ्ट, कॅपसमधील लाइटिंगची अनेक कामे, प्रवेशद्वारा जवळील इतर कामे, विविध रंगरंगोटी व संरक्षण भिंतीची कामे युध्द पातळीवर सुरु आहेत.