

मोहोळ : रमेश दास
मराठवाडा-गोदावरी विकास महामंडळांतर्गत कृष्णा -मराठवाडा सिंचन प्रकल्पामधून कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी भोयरे ता.मोहोळ येथील सीना नदीवरील घाटणे-भोयरे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पहिला बॅरेज पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला आहे. या बॅरेज बंधार्याचे काम पूर्ण झाले असून, पुढे उचल पाणी टप्प्याटप्प्याने मराठवाड्याला नेण्यासाठी पंपहाऊस व कॉनलसह इतर कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने ही योजना लवकरच पूर्णतःवाला नेऊन मराठवाड्याला सिंचनासाठी पाणी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (Krishna-Marathwada Irrigation Project work)
मराठवाड्याला सिंचनाचा लाभ मिळावा म्हणून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा योजना क्रमांक: २ कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या काही भागाला २१ टीएमसी पाणी देण्याच्या दृष्टीने नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला असून, माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या काळात हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागास ६ डिसेंबर २००१ रोजी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शासनाला प्रशासकीय अहवाल २१ जुलै २००५ च्या पत्राने सादर केला होता. महाराष्ट्र शासनाने २३ ऑगस्ट २००७ रोजी सन २००३ - ०४ च्या दरसूची प्रमाणे या प्रकल्पाची अंदाजे किंमत २३८२.५० कोटी किमतीच्या प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळाली होती.
मराठवाड्याला आठ टीएमसी टप्प्याटप्प्याने पाणी लिफ्टद्वारे नेण्यासाठी मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील सीना नदीवर सात मीटर उंचीचा बॅरेज पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला आहे. या बॅरेजमध्ये पाणी साठ्याच्या सर्वेक्षणाचे काम उस्मानाबाद सर्वेक्षण अन्वेषण पाटबंधारे विभागाकडून सन २००८ पूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. हा बॅरेज पद्धतीचा मोठा बंदरा घाटणे येथे असून उस्मानाबाद इरिगेशन पासून घाटणे बेरेचे अंतर ६८ किलोमीटर आहे. घाटणे बॅरेज बंधाऱ्याची लांबी १३० मीटर असून, १५ मीटर रुंदी आणि ७ मीटर मीटर उंचीचे ७ गेट तयार करण्यात आले आहेत. बंधाऱ्याजवळ पाणी साठवण्यासाठी एक मोठे पंपहाऊस बांधण्याचे काम चालू असून त्यातून अंदाजे ३००० एचपीच्या तीन ते चार विद्युत मोटारी बसविण्यात येणार आहेत. बॅरेजचा ९५१.४२ चौरस किमी कॅचमेंट एरिया असून अंदाजे ४.२६ टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो.
घाटणे येथील बॅरेजची १३४ एमसी( ३.८५ दशलक्ष घनमीटर) पुराच्या पाण्याची उंची १०.७० मीटर तर पाण्याची उंची सात मीटर आणि पूर पातळी ४५१.८६ मीटर असणार आहे. तर पाण्याची पूर्ण साठवण क्षमता ४४८.१६ मीटर आहे. प्रवाहाचा वेग ७२७७.१९ सीएस राहणार आहे. ही उचल पाणी योजना फक्त घाटणे बॅरेज मधून १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पावसाळ्यातच करण्यात येणार आहे. हे उचल पाणी घाटणे, भोयरे येथून हिंगणी, पडसाळी, वडाळा, तुळजापूर मार्गे उस्मानाबादला जाणार आहे. हे पाणी नेण्यासाठी काही ठिकाणी मोठ्या पाण्याचे नळ टाकले आहेत, तर काही ठिकाणी ओपन पाणी जाणार आहे.
मराठवाड्याला सिंचनाचा लाभ मिळावा, म्हणून राज्य शासनाने कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी विविध ठिकाणाहून देण्याचे मान्य केले आहे. या प्रकल्पास २३८२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. २१ टीएमसी पाण्यापैकी ६ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यातच असलेल्या बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी या तालुक्याला दिले जाणार आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतून उजनी जलाशयात ६३ टीएमसी पाणी येणार असून, त्यापैकी काही पाणी सीना-कोळेगाव प्रकल्पात सोडले जाणार आहे. उजनी धरणात सोडण्यात येणाऱ्या १९ टीएमसी पाण्यापैकी ११ टीएमसी पाणी सीना नदीद्वारे खाली सोडण्यात येणार आहे. त्यापैकी आठ टीएमसी पाणी मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे सीना नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेज पद्धतीच्या बंधार्यामध्ये अडवून पंपहाऊसमधून उचलून टप्प्याटप्प्याने लिफ्टद्वारे घाटणे ता.मोहोळ येथून भईरा,मसला,रामदारा बोरी प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे ११ टीएमसी पाणी मिळाल्यानंतर अंदाजे दोन लाख क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. त्या अनुषंगाने जवळपास उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ साठवण तलावांचे राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. मराठवाड्यामध्ये पाणी गेल्यास उस्मानाबाद ६,९२८, परांडा १९९६९, भूम २२८४९ , तुळजापूर २३८००, उमरगा ७३८३, लोहारा ७६५७ असे एकूण ९२,१४१ हेक्टर क्षेत्राला या सिंचनाचा लाभ होणार आहे. आठ टीएमसी पाणी तुळजापूर, उमरगा, लोहारासाठी देण्यात येणार असून या तालुक्यातील ३८८८० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
मराठवाड्याला सुरुवातीला २.५ टीएमसी पाणी मिळणार आहे. घाटणे बॅरेज ते रामदारा तलाव तुळजापूर हे अंतर ६३ किलोमीटर असून त्यामध्ये १६ किलोमीटर पाईपलाईन आहे.उर्वरित पाणी हे कॅनॉल द्वारे जाणार आहे. घाटणे येथील पंपहाऊस मधून उचललेले पाणी तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलावात सोडण्यात येणार आहे.या प्रकल्पाची जवळपास ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम हे लवकरच करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर लक्ष ठेवून आहे.
महाराष्ट्र क्लायमेट रेजिलीन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. या प्रकल्पाला जोडून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात वळविण्यासाठी १०० किलोमीटर बोगद्यातून पुराचे पाणी निरा नदीत सोडण्यात येणार असून, बॅरेज मधून पुढे उजनी धरणातून सोडले जाणार आहे. तिथून पुढे सीना नदीवर मोहोळ तालुक्यातील घाटणे बॅरेज पद्धतीच्या बंधार्यांमधून तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलावात सोडून, धाराशिव जिल्ह्यात पाणी आणण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी अंदाजे १५००० कोटीचा निधी लागणार आहे. जागतिक बँकेच्या माध्यमातून यासाठी कर्ज मिळण्याची दृष्टीने जागतिक वर्ल्ड बँकेच्या अधिकारी /कर्मचाऱ्यांनी घाटणे बॅरेज व पंपहाऊसची पाहणी केली होती.
२३.६६ टीएमसी पाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात टीएमसी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प अवर्षणग्रस्त धाराशिव जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असणारा असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
मराठवाड्यामध्ये पाणी गेल्यास उस्मानाबाद ६,९२८, परांडा १९९६९, भूम २२८४९ , तुळजापूर २३८००, उमरगा ७३८३, लोहारा ७६५७ असे एकूण ९२,१४१ हेक्टर क्षेत्राला या सिंचनाचा लाभ होणार आहे. आठ टीएमसी पाणी तुळजापूर, उमरगा, लोहारासाठी देण्यात येणार असून या तालुक्यातील ३८८८० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
जागतिक बँकेच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प कसा महत्वपूर्ण आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यास नागरिकांच्या अर्थकारणावर कसा परिणाम होणार आहे. याबाबत राज्य सरकारसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व सहकार्यातून जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या पथकात प्रवीण सिंह परदेशी, दीपक सिंग, सत्या प्रिया, सीना अरोरा यांचा समावेश होता.
तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा सुरू असून, जे.साई कन्ट्रक्शन व इतर विविध पाच ते सहा कंपन्यांच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाची पाहणी ते सतत करत आहेत. आ. पाटील हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर बैठका घेऊन वेळोवेळी सूचना देत आहेत.