

कामती : राहुल सोनवणे
मोहोळ तालुक्यातील कामतीजवळ गुरुवारी (दि.13 नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. टायर अचानक फुटल्याने पिकअप वाहन नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची माहिती मिळते.
या अपघातात महावीर वसंत खंदारे (45, रा. पोखरापूर, ता. मोहोळ) आणि बाई नागनाथ सिंगरे (50, रा. पोखरापूर, ता. मोहोळ) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही मजूर असून कोरवली येथून मोहोळकडे कामानिमित्त पिकअपमधून प्रवास करत होते.
कामतीपासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर पिकअपचे टायर फुटले आणि वाहन कॅनॉलजवळील रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत सर्वांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित चौघा जखमींवर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पिकअप क्रमांक (एमएच-13-डीओ-6816) हे कर्नाटकातील चडचण येथून पपई घेऊन कोरवलीमार्गे मोहोळकडे जात होते. प्रवासादरम्यान हा अपघात घडला. पुढील तपास कामती पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.