

माढा : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकाराने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याने महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. आज ना उद्या एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा आशावाद युवासेनेचे प्रदेश सचिव किरण साळी यांनी मंगळवारी (दि.१८) व्यक्त केला. ते वाकाव (ता. माढा) येथे युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत, माजी पं. स.सदस्य पृथ्वीराज सावंत, युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव ऋतुराज क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, सुजित खुर्द, प्रियंका परांडे, सचिन कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, उपप्रमुख बालाजी बागल, शिवसेनेचे माढा तालुकाप्रमुख मुन्ना साठे वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत उपस्थित होते.
यावेळी किरण साळी म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण, युवक कल्याण, एस. टी. बसमध्ये तिकिट सवलत या लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्यांच्या चेहर्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री बनतील. युवा विजय महाराष्ट्र दौर्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, युवासेनेचा विस्तार, महाविद्यालयीन युनिट्स तयार करणे, हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. 'घर तिथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना' या संकल्पनेद्वारे गावोगावी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात येत आहे. प्रा शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनात सोलापूर व धाराशिव येथील युवासेनेची बांधणी करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले. ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रा सावंत यांनी राबविलेल्या 'आरोग्याची वारी' या उपक्रमाचे कौतुक करत पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर येथे १२ ट्रक चादरी व धान्य या मदतीच्या कार्याची माहिती दिली.
पृथ्वीराज सावंत यांनी प्रास्ताविकात दौर्याचा उद्देश स्पष्ट करत यापुढील काळात शिवसेनेचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी संघटना वाढवायची आहे. ताकदीने व जोमाने निवडणूका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी प्रियंका परांडे, सुजीत खुर्द, शिवाजी जाधव, मुन्ना साठे, धर्मराज मुकणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा शिवाजीराव सावंत यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना टिकली. सोलापूर शहर मध्यच्या जागेवरचा हक्क सोडला. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, युवासेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी ऋतुराज सावंत यांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी अनेक मान्यवरांनी केली.