Solapur News: खामगाव-कुसळंब रस्त्याची दुरवस्था

जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांचा शाळेकडे प्रवास
Solapur News: खामगाव-कुसळंब रस्त्याची दुरवस्था
Published on
Updated on

बार्शी : तालुक्यातील खामगाव-कुसळंब हा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः उखडला असून ठिकठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. या रस्त्यावरून दररोज खामगाव येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्‍च माध्यमिक आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

या मार्गावरून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बसही धावते. मात्र रस्त्यांवरील मोठे खड्डे आणि चिखलामुळे बसचालकांना गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. बस हळूहळू चालवावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायलाही उशीर होत आहे. दुचाकीस्वार आणि पादचारी तर खड्डे चुकवताना अनेकदा तोल जाऊन पडत आहेत. रस्त्याची दुरवस्था प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी विद्यार्थी खड्ड्याजवळ उभे राहून रस्त्याची अवस्था दाखवत होते. पावसाळ्यात खड्डे पाण्याने भरल्याने त्यांची खोली समजत नाही. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती पालक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. ‘एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता रस्ता त्वरित दुरुस्त करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता जीवाचा प्रश्न बनला आहे,’ अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. खामगाव परिसरातील हा रस्ता अनेक गावांना जोडणारा असल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे. तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news