

करमाळा : शालेय विद्यार्थ्यांना स्टिंगसारख्या उत्तेजक पेयापासून दूर ठेवण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या करमाळा शाखेने निवेदनाद्वारे केली आहे. ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठांना निवेदन दिले आहे. सदरचे निवेदन गटशिक्षण अधिकारी कार्यालयात टकले यांनी स्वीकारले.
यावेळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी, करमाळा तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव नलावडे, करमाळा तालुका संघटक अजिम खान तसेच करमाळा तालुका कार्यकारिणीचे सदस्य संजय हंडे, भीमराव कांबळे, मंजिरी जोशी, अनिल माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टिंग तसेच तत्सम उत्तेजक असलेले पेय पिण्याची एक सवय दिसून येत आहे. अशा पेयाचे दूरगामी परिणाम मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरती दिसून येतात. त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणून या मुलांना त्यापासून दूर ठेवण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यही या द्रव्याच्या सेवनामुळे धोक्यात येत आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र देऊन याबाबत अवगत करावे. त्याचबरोबर प्रत्येक शाळांनी मुले हे पेय विकत घेणार नाहीत, तसेच पिणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत आपण त्यांना आदेशित करावे, अशी मागणी केली आहे.