

सोलापूर : काशी महापीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी शुक्रवारी कुडल (दक्षिण सोलापूर) येथील संगमेश्वर मंदिरात भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले.
यावेळी सद्भक्त मल्लप्पा पाटील यांनी संगमेश्वर देवस्थान सुधारणा समितीच्या वतीने महास्वामींचे स्वागत केले. यावेळी संगप्पा केरके, मल्लप्पा पाटील, चन्नप्पा बगले, मल्लिकार्जुन यमदे, राजेंद्र बलसुरे, अनिल सर्जे यांच्यासह आदी उपस्थित होते.
प्रारंभी महास्वामींनी बहुमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत या लिंगाची महती जाणून घेतली. त्यानंतर हरिहरेश्वर मंदिरात जाऊन बहुमुखी श्रीकृष्ण, नागनाथाचे कोरीव शिल्प, संगमेश्वरांचे गर्भमंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले. परिसरातील निसर्गरम्य, भक्तिमय वातावरण पाहून समाधान व्यक्त केले.
संगमस्थळावर जाऊन भीमा-सीना नदीच्या संगमवरील पात्रात नौकाविहार केले. त्यानंतर उपस्थित सदभक्तांना आशीवर्चन केले. हजारो वर्षांचा हा पुरातन मंदिर असून, दगडी बांधकाम आणि कोरीव मुर्ती हे येथील मंदिराचे वैशिष्ट्य आहे. आक्रमणामुळे मुर्ती भग्नअवशेष झाल्या आहेत. मंदिराच्या जीर्णोध्दारेचे काम सुरु असल्याबाबत समाधान व्यक्त केले.