

Kartiki Wari 2026
पंढरपूर : सुरेश गायकवाड
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समितीचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
वारीच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवासाचा पास त्यांना प्रदान करण्यात आला.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.