Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीसाठी पाच लाख वैष्णव दाखल

आज मुख्य सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पहाटे महापूजा
Kartiki Ekadashi
Kartiki EkadashiPudhari
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : ‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा सोहळा शनिवारी (दि. २१) लाखो वैष्णवांच्या उपस्थित भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत पाच लाख भाविक दाखल झाले आहेत.

दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजून २० मिनिटांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्य तसेच खासदार व आमदार उपस्थित होते.

पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शनरांग मंदिरापासून पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर दशमी दिवशी गेली आहे. मंदिरापासून सुमारे चार किमी अंतरावर दर्शनरांग पोहोचली आहे. दर्शनरांगेत एक लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. तर ६५ एकर भक्तिसागरात तीन लाख भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तंबू, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.

चालू वर्षात पाऊस झाला नसल्याने यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप, रब्बी हंगाम वाया गेले. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याचा परिणाम म्हणून कार्तिकी यात्रेला भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दर्शनरांग गोपाळपूरपर्यंतच पोहोचली आहे. दर्शनरांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान १० ते १२ तासांचा कालावधी लागत आहे.

एका मिनिटाला साधारणपणे ३५ ते ४० भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. मुखदर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत दर्शनरांग पुढे सरकली आहे. मुख दर्शनासाठी देखील किमान तीन ते चार तासाचा कालावधी लागत आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्त निवास हाऊसफुल्ल झाली असून भाविक भजन, कीर्तन करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.