

मोडनिंब : अरण (ता. माढा) येथून मंगळवारी सायंकाळी संत सावता माळी विद्यालयाच्या मैदानावरून गायब झालेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय 10) या बालकाचा मृतदेह 5 दिवसांनंतर जाधववाडी हद्दीतील (मोडनिंब-जाधववाडी वितरीका) कोरड्या कॅनॉलमध्ये छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कार्तिक हा गावातील जत्रेत खेळण्यासाठी जातो असे सांगून गेला होता, तो परतला नसून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार टेंभुर्णी पोलिसांत दाखल झाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नारायण पवार व सहायक पोलिस निरीक्षक गिरीश जोग यांच्या पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल 5 दिवसांनंतर शनिवारी कार्तिकचा मृतदेह जाधववाडी हद्दीतील कॅनॉलमध्ये आढळून आला.
पोलिसांना शनिवारी सकाळी फोन आला की एक व्यक्ती कॅनॉलमध्ये मृत झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर पोलिस व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी तो मृतदेह कार्तिकचा असल्याचे सांगितले. घटनास्थळावरून दोन चाकू, दोन हातमोजे व एक दगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे अरण, बैरागवाडी, जाधववाडी व मोडनिंब या परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.