

Karmala Farm Laborer Death
करमाळा : महावितरणच्या तुटलेल्या वीजतारेला स्पर्श झाल्याने करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील विजय वसंत क्षीरसागर (वय ६०) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १३) दुपारी दोन ते सव्वादोनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
विजय क्षीरसागर हे गुळसडी-पांडे रस्त्यालगत हनुमंत उद्धव पाटील यांच्या उसाच्या शेतात फवारणीचे काम करत होते. यावेळी शेतात तुटून पडलेल्या महावितरणच्या उघड्या वीजतारेला त्यांच्या पायांचा स्पर्श झाला. त्यातून विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गुळसडी येथील युवकांनी तातडीने महावितरण आणि करमाळा पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर महावितरणच्या वायरमनने घटनास्थळी येऊन वीजपुरवठा खंडित केला. करमाळा पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली.
संबंधित वीजतार तब्बल आठ ते दहा दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत होती. याबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शेतामध्ये तुटलेल्या वीजतारा पडलेल्या असताना त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी तसेच मृत विजय क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना शासन व महावितरणकडून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.