

करमाळा : करमाळा शहरात अनेक ठिकाणी वीजवाहक तारेवर झाडाच्या फांद्या घुसलेल्या आहेत. याबाबत नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दूरसंचार व महावितरण कंपनीचा हा हलगर्जीपणा आहे की जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे परवानगी असूनही धोकादायक फांदी कायम ठेवण्याचा प्रकार घडत आहे. वरिष्ठ प्रशासन याकडे लक्ष देणार का? अशी विचारणा नागरिक करत आहेत.
शहरातील दत्त मंदिर ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या दूरसंचार विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील विजेच्या तारांवर पडलेल्या झाडाच्या फांदीचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे.
यापूर्वी या संदर्भात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे तक्रार झाल्याने संबंधित विभागांमध्ये पत्रव्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती. नगरपरिषदेने संबंधित फांदी काढण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या कार्यालयाचे अधिकारी संदीप पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. तरीही दूरसंचार व महावितरणकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.