

करमाळा : करमाळा नगरपालिकेच्या २०२५ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठे ट्विस्ट निर्माण झाले असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तब्बल ५५ शाखाप्रमुखांनी त्यांनी केलेल्या वीस हजार सभासदासह राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठाकडून विश्वासात घेतले जात नसल्याने हा राजीनामा देण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
करमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मकाई कारखान्याचे संचालक सतीश निळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, माजी सरपंच नवनाथ बदर, अशोक हनपूडे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, राणा वाघमारे, विजयसिंह हाके, रवी शेळके , अक्षय सरडे, केशव बोराडे, साधू शिंदे, आनंद टेकाळे, विजय काळे, प्रशांत पवार, केशव बोराडे, संदीप गोडसे, महादेव माने, सतीश सोनवणे, दत्तात्रेय काळे, लहू पवार, सचिन शिंदे, पप्पू सरक, शहाजी काळे, दीपक हाके, संदीप हाके, सतीश घेडे, हेमंत शिंगरे, सुदाम झोळ, हेमंत गिरंजे, संजय डोळे, संतोष चांदणे, ओमकार करे, प्रमोद हाके, प्रतीक हाके, विशाल माने, किरण डोंगरे, संदेश भोगे, जावेद पठाण, मुबारक इनामदार आधी शाखाप्रमुखांनी राजिनामे दिले.
माजी आमदार जयंतराव जगताप यांना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा व कुर्डूवाडी येथे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे .वास्तविक पाहता शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूकीमध्ये कोणीही निवडणूक लढवण्यास तयार नसताना मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी शिवसेनेच्या शिंदे गटांमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवून अवघ्या तीन आठवड्यामध्ये तब्बल ४० हजाराहून अधिक मते मिळवली होती. असे असताना करमाळा तालुक्याची विधानसभा क्षेत्रामध्ये दिग्विजय बागल यांच्यावर भिस्त असताना त्यांना विश्वासात न घेता शिवसेनेच्या वरिष्ठाकडून विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात होत्या.
करमाळ्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी हे समोर आल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने त्यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दिग्विजय बागल यांनाही शिवसेना सोडण्यासाठी आम्ही प्रवृत करून दबाव टाकणार आहे. ज्या ठिकाणी किंमत केली जात नाही , विचारात घेतले जात तिथे राहण्यात अर्थ नाही.कवडीमोल लोकांच्या आग्रहाणे बागलावर अन्याय होत आहे. त्यामुळे हा कटू निर्णय घेतला आहे.
सतीश निळ, संचालक,श्री मकाई सह साखर कारखाना संचालक.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात घडामोडींना वेग आला आहे निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत आहे. करमाळ्यातही त्याचे लोण पोहचले असून पालिका निवडणुकीत तब्बल शिवसेनेच्या ५५ शाखाप्रमुखांनी त्यांच्या २० हजार सदस्यांसह शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकल्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे.
करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदेगटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळत आहे. जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिले आहे. शिवसेनेचे वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.