Karmala Panchayat Samiti Results : करमाळा पंचायत समितीत सत्तांतर

आमदार नारायण पाटील गटाचा पराभव; करमाळ्यात महायुतीची सत्ता
Karmala Panchayat Samiti
Karmala Panchayat Samiti
Published on
Updated on

- अशपाक सय्यद

करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 व जिल्हा परिषदेच्या सहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील विद्यमान आमदार नारायण पाटील गटाचा पराभव झाला. या ठिकाणी महायुतीने बाजी मारली असून भाजपाचे नेतृत्व करत असलेले रश्मी बागल व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करत असलेले संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारांनी समान विजय मिळवला आहे.

जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन व नारायण पाटलांच्या तालुका विकास आघाडीने दोन जागी यश संपादन केले आहे.पंचायत समिती गणाच्या बारा जागेमध्येही समसमान यश यांना मिळाले असले तरी महायुतीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने त्यांनीही प्रत्येकी चार अशी आठ जागी यश संपादन केले आहे हे सर्व मान्य करावे लागेल. त्यांच्या विरोधातील तालुका विकास आघाडीचे नेतृत्व करत असलेले विद्यमान आमदार नारायण पाटील यांनीही एकटे निवडणूक लढवत असतानाही चार जागा पटकावून आपल्या अस्तित्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाने पांडे व वीट, राष्ट्रवादी काँग्रेसने चिकलठाण व कोर्टी व नारायण पाटील यांच्या तालुका विकास आघाडीने वांगी व केम या जिल्हा परिषदेच्या जागा पटकावल्या आहेत. पंचायत समितीच्या बारा गणातील भाजपाने रावगाव, कोर्टी, वीट व वांगी या जागा पटकावल्या आहेत. त्यांच्या बरोबर युती असलेले अजित पवार गटाचे संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चिकलठाण, हिसरे, साडे व केतुर या चार जागी यश संपादन केले आहे. तालुका विकास आघाडीचे नेतृत्व करत असलेले नारायण पाटील यांच्या गटाने जेऊर, पांडे, केम व उमरड या जागी यश संपादन केल्याने आठ विरुद्ध चार असे बलाबल पंचायत समितीमध्ये झाले आहे.

2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून असलेल्या आमदार नारायण पाटील यांनी सत्ता हस्तगत केली होती यावेळी मात्र त्यांना सत्तेतून बाहेर बसावे लागले आहे. महायुतीने विजय मिळवला असला तरी भाजपच्या माध्यमातून बागल गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संजयमामा शिंदे यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून युती झाली होती. त्यांनी समसमान जागा वाटप केले होते. जागा वाटपाचा विषय संपल्याने या महायुतीच्या उमेदवार वेळीच कामाला लागले. दोन्ही गटाने एकत्र येऊन प्रचाराचा धडाका लावला. यांच्या उमेदवारांनी नेतृत्वासह घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर मोठा भर दिला त्यामुळे हे यश मिळणे त्यांना सोपे झाले.

करमाळा तालुक्यात पांडे वीट गटामध्ये उल्लेखनीय चुरशीच्या लढती झाल्या. एकेकाळी बागल गटाच्या सोबत असलेले संतोष वारे यांनी बागल गटाशी फारकत घेऊन पांडे गटामध्ये भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनाच आव्हान दिले. या जागेसाठी गेल्या नऊ वर्षांपासून ते पुन्हा प्रयत्नात होते अनेक विकासकामे त्यांनी केली होती. यातच या दोघांच्या विरोधात सावंत गट ही सरसावला. सावंत गटाने ही करमाळा नगरपालिकेमध्ये जगतापांचा पराभव करीत सत्ता स्थापन केली. त्यामुळे त्यांची विद्यमान आमदार नारायण पाटील गटाच्या माध्यमातून दिलेली उमेदवारी ही चुरशीची ठरली. या निवडणुकीमध्ये त्यांना दुसऱ्या स्थानाची मते मिळाली. रश्मी बागल यांना 9247 मते मिळाली तर ज्योती सावंत यांना 7104 मते मिळाली आहेत. त्या खालोखाल 6535 मध्ये राणी वारे यांनी घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याची पाहायला मिळाले आहे. रश्मी बागल यांनी 2143 मताधिक्याने विजय मिळवला असला तरी त्यांच्या मताची आघाडी मात्र या ठिकाणी राणी वाऱ्याचे उमेदवारीमुळे घटल्याचे दिसून आले आहे.

वीट गटामध्ये अश्विनी चिवटे यांनी अभूतपूर्व मते मिळवली. त्यांनी तब्बल 14736 मते घेतली. त्यांनी विरोधी उमेदवार रत्नमाला राजे भोसले यांच्यावर साडेसात हजाराचे मताधिक्य घेतलेने चर्चेचा विषय ठरले आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पराभव होण्यामध्ये अनेक कारणे चर्चिले जात आहेत. आदिनाथ कारखान्याला मदत व्हावी या प्रमुख उद्देशाने त्यांनी तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे मार्गदर्शक राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील गटाने त्यांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. यामधून त्याचे एकमत न झाल्याने मोहिते पाटील गट आमदार नारायण पाटील यांच्यापासून बाजूला पडला. त्याबरोबरच तिकिटाची वाटणी न झाल्याने व जगताप यांचा रुसवा काढण्यात नारायण पाटील गट अयशस्वी ठरल्याने जगताप गटत्यांच्यापासून दूर झाला. त्यामुळे नारायण पाटील यांना एकाकी लढा द्यावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news