

करमाळा : तालुक्यातील विहाळ येथील मारकड वस्ती येथे वास्तव्यास असलेले मारकड दाम्पत्याच्या घरात दोन चोरट्यांनी प्रवेश मिळवून वृद्ध महिलेच्या डोक्यात जबर मारहाण करून त्याचे डोके फोडले व त्याच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह 81 हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला. कांताबाई नारायण मारकड (वय 80, रा. विहाळ ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कांताबाई मारकड व पती नारायण मारकड (वय 90) या मंगळवारी रात्री जेवण करून झोपले असता पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून जिवे मारण्याची धमकी दिली. एकाने वृद्ध महिलेच्या डोक्यात हत्याराने घाव घालून रक्तबंबाळ केले. वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या वाट्या व मणी असलेले तसेच कानातील सोन्याची कर्णफुले ओढून घेतली. मोबाईलही काढून घेतला. कपाटातील 10 हजार रुपये घेऊन पळून गेले. सकाळी शेजारीपाजारी राहणारे लोक येऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
संबंधित या चोरट्यांचा सहायक पोलिस निरीक्षक पोपटराव टिळेकर हे तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यापासून करमाळा तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.