

करमाळा : तालुक्यात आतापर्यंत महानेट, जिओ, एअरटेल या कंपन्यांकडून करमाळा तालुक्यात इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व स्थानिक नेतेमंडळी, वजनदार लोकांच्या मदतीने राज्य महामार्ग 68 सह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या साईडपट्ट्या अक्षरशः उखडून टाकल्या आहेत. सध्या मुंबई वेरूळ येथील एका खासगी कंपनीकडून नियमबाह्य काम सुरू असून या कंपनीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
रस्ते व साईडपट्टी मजबूत करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च केला जातो; मात्र दरवर्षी नवीन एक कंपनी येवून आमच्याकडे शासनाच्या सर्व परवानग्या आहेत, केंद्र सरकारचे काम आहे असे सांगून स्थानिक पोट कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने खोदकाम करून रस्ते, साईडपट्टी , तसेच दिशा दर्शक किलोमीटरचे मैल देखील उखडून टाकत आहेत.
शासकीय सोपस्कार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, जिल्हापरिषद बांधकाम विभाग यांच्याकडून नियमबाह्य काम बंद करा अथवा गुन्हे दाखल करू अशा नोटिसा काढल्या जातात मात्र शासनाच्याच मालमत्तेचे लाखोंचे नुकसान करत महसूल, बांधकाम, जिल्हापरिषद बांधकाम विभागाच्या नावावर टिच्चून हे नियमबाह्य काम सुरूच आहेत.