

करमाळा: पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भरधाव पिकअपने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि. १९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करमाळा-अहिल्यानगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जातेगावजवळ घडला. अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून फरार झाला आहे.
निलाबाई पांडुरंग चकोर (वय ५५, रा. ओणे, ता. निफाड, जि. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. सतीश हळदे (वय ३५) आणि जिजाबाई हळदे (वय ८०) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सतीश रामदास हळदे (३५), सुमन रामदास हळदे (५५), मंदा हरिभाऊ हळदे (५५), जिजाबाई दौलत हळदे (८०), रंभाबाई गंगाधर हळदे (८०), लक्ष्मीबाई गोविंद हळदे (५५), सजुबाई रामनाथ हळदे (५०), सिंधुबाई ज्ञानेश्वर गोसावी (५५), सागर गुजाराम हळदे (२९), रावसाहेब बाळासाहेब हळदे (५५), निर्मला रावसाहेब हळदे (४८), चंद्रभागा गोविंद कातकाडे (६०), कमल रामदास हळदे (६६), ऋषीकेश रामदास कातकाडे (२७), बेबी बाबुराव बागले (६५), रत्नाबाई रामदास हळदे (५६) (सर्व रा. ओणे, ता. निफाड, जि. नाशिक).
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओणे येथील हळदे कुटुंबीय आणि इतर भाविक आषाढी वारीला जाता न आल्याने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी एका पिकअप वाहनाने (एमएच ४१ एआर ७०२७) निघाले होते. त्यांचे वाहन करमाळा तालुक्यातील जातेगाव शिवारातील मेवात हॉटेलजवळ आले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या पिकअपने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक देणारे वाहन मांगूर माशांचे खाद्य घेऊन जात होते, अशी माहिती मिळाली आहे. धडक इतकी भीषण होती की, भाविकांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. चार रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोलाची मदत केली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलाबाई चकोर यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. करमाळा पोलिसांनी फरार पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.