

करमाळा: करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथील तरुण जयराज पिंटू येवले वय २० वर्ष याचा कर्नाटक येथे झालेल्या अपघातात काल (ता.३१ जुलै) रोजी मृत्यू झाला आहे. तो गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कांदा घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकच्या सोबत तो कर्नाटक येथे गेला होता.
कांदा खाली करून रिकाम्या ट्रकने तो गावाकडे परतत होता. यावेळी कर्नाटक राज्यातील कोपल जिल्ह्यामध्ये झालेल्या कंटेनर सोबतच्या भीषण अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. याची खबर बिटरगाव येथे मिळताच शोककळा पसरली आहे. गावातील त्याच्या मित्रांनी आज सकाळी (१ऑगस्ट) त्याचे शव बिटरगाव श्री येथे आणले. यावेळी पांडुरंग वस्तीवर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वडील, आजी ,आजोबा, एक बहीण असा परिवार आहे.
बालपणीच त्याच्या आईचे दुर्दैवी निधन झाल्याने त्याचा आजी आजोबाने सांभाळ केला होता. त्याने हिमतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले होते .त्यानंतर तो पोटापाण्यासाठी करमाळ्यात हमाली करत होता. त्या अनुषंगानेच तो कांद्याच्या ट्रक सोबत कर्नाटक येथे गेला होता मात्र दुर्दैवाने काळाने त्याला तेथेच गाठले. होतकरू तरुणाच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.