

पोखरापूर : प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, पान मसाल्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने २८ जानेवारी रोजी मोहोळ तालुक्यातील कामती येथे संशयास्पदरित्या जात असलेला ट्रक थांबून त्यातील तब्बल ६६ लाख १६ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू जप्त करत ४ जणांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. २८ जानेवारी २५ रोजी अन्न सुरक्षा पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मंद्रूपहून कामती मार्गे एका वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार अन्नसुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर, मंगेश लवटे, उमेश भुसे तसेच नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने मोहोळ तालुक्यातील कामती चौकात सापळा लावला.
त्यादरम्यान मंद्रूप रोड वरून मोहोळ कडे संशयितरित्या ट्रक एम.एच.४०, ए.के.८६९३ हे वाहन येताना दिसले. त्या वाहनास थांबवून वाहन चालकाकडे चौकशी करुन वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ विमल पानमसाला २००० बॉक्स, व्हि-१ सुगंधित तंबाखु २००० बॉक्स, विमल पानमसाला- २४००० पाकिटे, व्हि-१ सुगंधित तंबाखु- २४००० पाकिटे व विमल पानमसाला- १८०० पाकिटे अशी एकूण एकत्रित किंमत रुपये ६६ लाख १६ हजार ६०० चा साठा आढळून आला.
याप्रकरणी वाहनचालक विजय शिवानंद कंबार रा. आझाद रोड, आळणावर, धारवाड (कर्नाटक), साठा मालक- सुजित खिवसारा, रा. पुणे, वाहन ट्रान्सपोर्टर मालक रफिक मेनन, वाहन मालक सौ. लक्ष्मी सुनिल रहागडाले यांच्या विरुध्द कामती पोलिस स्टेशन येथे अन्नसुरक्षा अधिकारी अशोक इलागेर यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षीत करत आहेत. ही कारवाई सह. आयुक्त उल्हास इंगवले, सुरेश अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सुनिल जिंतुरकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर, मंगेश लवटे, उमेश भुसे व नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली.