सोलापूर : कला व साहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांना मानधन मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली वृद्ध कलावंत निवड समितीची मंगळवारी (दि. 9) स्थापना झाली आहे. त्यामुळे वृद्ध कलावंतांना न्याय मिळणार आहे.
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना अंतर्गत वृद्ध कलावंतांना पाच हजार रुपये मानधन मिळते. त्या कलावंतांना तत्काळ मानधन मिळावे, निवड समितीने वृद्ध कलावंत मानधनासाठी आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून त्यांना मानधन देण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली वृद्ध कलावंतांची समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका उपायुक्त, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दहा जणांची अशासकीय सदस्य म्हणून निवड
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिफारस केलेल्या सदस्यांमध्ये वामन बावळे, सुरेश बेगमपुरे, पंडित जाधव, रावसाहेब पाटील, जगन्नाथ इंगळे, ब्रह्मदेव केंगार, भालचंद्र राजगुरू, नंदकुमार पाटोळे, ज्योतीराम चांगभले, सागर बोराटे यांची वृद्ध कलावंत समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

