

दक्षिण सोलापूर : विजापूर रोडवर नवीन एसटी बसस्थानक उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या बसस्थानकासाठी एक हेक्टर जागा उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावाला सक्षम प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही त्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे.
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जुळे सोलापूर परिसरात नवीन एसटी बसस्थानक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून त्यांना लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. आमदार सुभाष देशमुख यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करत होते, अखेर त्यास यश आले आहे
जुळे सोलापूर येथील विजापूर रस्त्यावर एसटी बसस्थानकासाठी एक हेक्टर जागा विनामूल्य, नाममात्र दराने किंवा नियमित भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी जागा उपलब्ध न झाल्यास शासकीय मूल्य अदा करून जागा संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला सक्षम प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून, एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरावही पारित करण्यात आला आहे. मात्र, पुढील आवश्यक कार्यवाही अद्याप विभागीय स्तरावर प्रलंबित असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
जुळे सोलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. येथील नागरिकांना एसटीने प्रवास करण्यासाठी सध्याच्या बसस्थानकावर जावे लागते. स्वतंत्र बसस्थानक झाल्यास विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नोकरदारांची मोठी सोय होणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत होईल. आता जागा संपादनाची प्रक्रिया कधी पूर्ण होते आणि प्रत्यक्ष बसस्थानकाच्या उभारणीला कधी सुरुवात होते, याकडे जुळे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.