

सोलापूर : पुरवठा विभागाने यंदा सोलापूरसह राज्यातील 19 जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय मागील हंगामातील ज्वारीच्या जादा खरेदीमुळे घेण्यात आला आहे.
राज्यातील अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत दरमहा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ दिला जातो. तर प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतो. मागील तीन वर्षांपासून सण-उत्सवाच्या काळात शासनाकडून आनंदाचा शिधा म्हणून अतिरिक्त वस्तूंचे वाटप केले जात होते. मात्र, या वर्षी तो रद्द करण्यात आला आहे.
त्याचबरोबर, पुरवठा विभागाने यंदा सोलापूरसह पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, बुलढाणा, अकोला, जळगाव, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नंदुरबार 19 जिल्ह्यांमध्ये गहू आणि ज्वारी समान प्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. या जिल्ह्यांसाठी अकोला येथून तर अन्य 12 जिल्ह्यांसाठी बुलढाणा येथून धान्य उचलण्याची कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. आता नोव्हेंबरपासून अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना आता 20 किलो तांदूळ, साडेसात किलो गहू आणि साडेसात किलो ज्वारी मिळणार आहे. प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना एक युनिटसाठी एक किलो गहू, एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ असे प्रमाण ठरविण्यात आले आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार, 2024-25 या वर्षात ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी सरकारने केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानातून ज्वारीचे प्रत्येकी एक किलोचे वाटप करण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागाला केली होती.