

सोलापूर : एसटीला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्या सोलापूर विभागातील जवळपास 200 बसचे आयुर्मान 13 वर्षांहून अधिक झाले आहे. या खिळखिळ्या झालेल्या जुन्या बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास रामभरोसे होत असल्याचे दिसून येते.
सोलापूर विभागातील नऊ आगरातील तब्बल 200 गाड्यांचे आयुष्य 13 वर्षे पूर्ण झाले आहेत. अद्यापही या गाड्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. या बस रस्त्यांमध्ये बंद पडण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ लागत आहे. मनस्तापही सहन करावा लागतो. एकंदरीत सोलापूरकरांना खिळखिळ्या बसमधून भाडे दरवाढीचा प्रवास करावा लागत आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सोलापूर विभागात आतापर्यंत 23 ई-बस धावत आहेत. या बस सोलापूर-पुणे, सोलापूर-लातूर, सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-पंढरपूर या मार्गावरच सुरू केल्या आहेत. त्यांची संख्या खूपच नगण्य आहे. त्यामुळे जुन्या बसशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. मागील वर्षात 63 बस स्क्रॅप झाल्या आहेत.
एसटीने महिलांसाठी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर सर्वच भागात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सोलापूर विभागातून सुटणार्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी असली तरी विभागाकडे पुरेशा बस उपलब्ध नाहीत. सोलापूरहून जवळच असलेल्या धाराशिव आगारात नव्याने बस दाखल झाल्या. पण, सोलापूर विभागाला अद्यापही गाड्यांची प्रतिक्षाच करावी लागत आहे.