

सोलापूर : पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे. 24 तास पत्रकार हे समाजासाठी कार्यरत असतात. चांगला असो किंवा वाईट प्रसंग असो कुठल्याही काळात ते नि:पक्षपणे रस्त्यावर कार्यरत असतात. अशा पत्रकारांचा गौरव हा समाजातील सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जीवन गौरव, पत्रकारिता सन्मान सोहळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचा पदग्रहण समारंभ मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये, मिलिंद कुलकर्णी, व्यंकटेश पटवारी, प्रशांत माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते.
संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी प्रास्ताविक भाषणात जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. अभिषेक आदेप्पा यांनी आभार मानले.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, सिद्धाराम पाटील, प्रताप नाईक, योगेश बोरसे, राहुल झोरी यांना गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्याच्या अध्यक्षपदी सोलापूरचे मनिष केत यांची निवड झाली. जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला. या कार्यक्रमात त्यांचा पदग्रहण सोहळा झाला. केत यांनी अगोदर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि वृत्तवाहिनी संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे.