

सोलापूर : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून हैदराबादच्या सहाजणांनी सोलापुरातील एकाची 12 लाख 68 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 30 मे ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान घडली.
याप्रकरणी समी शाबोद्दीन जमादार (वय 29, रा. मोदी खाना, सोलापूर) यांनी सदर बाझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मो. अब्दुल अजहर इम्रान (रा. विजयनगर कॉलनी, आसिफनगर, हैदराबाद), फातिमा सईदा, विशाल श्रीकांत, किरणकुमार तरासी (सर्व रा. हैदराबाद), जी. आर. बेनहूर (रा. सिकंदराबाद), जेनुकला नवनीत (रा. हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या सर्वांनी शमी जमादार यांच्याकडून नोकरी लावतो असे सांगून वेळोवेळी पैसे घेतले; मात्र नोकरी लागली नाही. जमादार यांनी हैदराबाद येथे जाऊन अब्दुल अजहर इम्रान यांना पैसे परत देण्याची मागणी केली. तेथे गणेश नामक व्यक्तीने मध्यस्थी करून ‘तुम्हाला यापुढे एक रुपया देण्याची गरज नाही, तुम्हाला नोकरी लावण्यात येईल’ अशी समजूत काढून पैसे परत न देता पाठवून माघारी पाठवून दिले. त्यामुळे नोकरी न लावता एकूण 12 लाख 68 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.