

बार्शी : शहर पोलिसांनी तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने अवघ्या 3 तासांत 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील आरोपी नागेश राज् बगाडे (वय 32, रा. झाडबुके मैदानामागे, पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी) याला मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विलास दत्तात्रय सुरवसे हे भगवंत मंदिरात असताना त्यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून 3 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या घटनेनंतर फिर्यादीने बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्हा नोंदवताच शहर पोलिस ठाण्याचे पो. नि. बालाजी कुकडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाला कामाला लावले. पथकाने अचूक नियोजनासह बार्शी शहरातील सीसीटीव्ही फुटेज यांचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे अवघ्या 3 तासांत आरोपी नागेश राजू बगाडे याला चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह रिंग रोड बार्शी येथून ताब्यात घेतले.
ही कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पो. नि. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफो अजित वरपे, अमोल माने, बाळासाहेब डबडे, साठे, धनराज फत्तेपुरे, जाधव, पवार, उदार, सचिन देशमुख, सचिन नितनात, बहिरे, शेख, सतीश उघडे, भांगे यांनी बजावली.