

सोलापूर : शहराच्या विकासासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक प्रस्ताव समोर येत आहेत. हा प्रस्ताव जरी इंग्रजीत असला तरी तो समजून घेतला पाहिजे. शहराच्या विकासासाठी जबाबदारीने भूमिका घेतली पाहिजे, असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आ. विजयकुमार देशमुख व आ.सुभाष देशमुख यांना लगावला. त्यामुळे पालकमंत्री गोरे विरुद्ध भाजपचे दोन्ही देशमुख आमदार यांच्यातील वर्चस्वाची लढाई पुन्हा समोर आली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सकाळी तातडीने सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, शहाजी पवार उपस्थित होते. सोलापुरातील नागरिकांना कोणतीही टॅक्सवाढ होणार नाही याची दक्षता भाजपने घेतली आहे. मात्र याचा सर्व निर्णय महापालिका घेणार आहे. नियमित कर भरणाऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच कर न भरणाऱ्यांकडूनही कर वसूल करण्याची योग्य भूमिका महापालिकेकडून घेण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात दिलेला शब्द पूर्ण करण्यात येत आहे. सोलापूकरांवर करवाढीचा भार न टाकता रोज पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीनेच महपालिकेचे पाउल पुढे पडत असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाकडून विकास कामांसाठी प्रस्ताव काढण्यात आला होता. हा प्रस्ताव इंग्रजीत असल्याने काहींनी आयुक्तांचे दालन गाठले. आमदार कोणत्या पक्षाचे यापेक्षा आमदारांनी समोर असलेला प्रस्ताव समजून घेत त्यावर अभ्यास करून आपली भूमिका व्यक्त करणे अपेक्षित असल्याचा सल्ला पालकमंत्री गोरे यांनी आ.सुभाष देशमुख व आ. विजय देशमुख यांना अप्रत्यक्षपणे दिला.