Jaykumar Gore : भाविकांना चंद्रभागा निर्मळ दिसली पाहिजे

पालकमंत्री जयकुमार गोरे; वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ ठेवण्याच्या दिल्या सूचना
Jaykumar Gore
पालकमंत्री जयकुमार गोरे
Published on
Updated on

पंढरपूर : कार्तिकी यात्रेत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणार्‍या लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबत चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पूर्ण केल्याचे समाधान मिळत नसते. त्यामुळे वारकरी संप्रदायात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाएवढेच चंद्रभागेच्या पवित्र स्नानाला महत्त्व आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील, स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना चंद्रभागा पात्र निर्मळ दिसले पाहिजे, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत.

कार्तिक यात्रा नियोजनाबाबत के.बी.पी. कॉलेज पंढरपूर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धोत्रे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मंदिर समिती व नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर येथील दररोज स्वच्छता करावी. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटले पाहिजे. तसेच वाळवंटात जादा तात्पुरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध ठेवावी. त्याचबरोबर वाळवंटात कायमस्वरूपी पर्यावरणपूरक शौचालय स्थापन करण्याबाबतचे नियोजन करावे. उघड्यावर शौचालयास बसू नये, यासाठी जनजागृती व आवश्यक उपाययोजना कराव्यात. दर्शनरांगेतील भाविकांना तत्काळ व सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी. यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन तसेच दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर भाविकांना सुरक्षा रक्षकांचा नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन, सुरक्षारक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमावेत.

चंद्रभागा नदी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सुस्थितीत बोटी तसेच प्रशिक्षित कर्मचारी सज्ज ठेवावेत. महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावेत. चंद्रभागा एसटी स्टँडवर स्वच्छता व सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारी कालावधीत अवैध दारू विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत नियोजन करावे. आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी यात्रेत भाविकांना सुविधा द्याव्यात. आषाढी यात्रा कालावधीत सर्व विभागाने उत्तम नियोजन केल्याने आषाढी वारीत भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. त्याच पद्धतीने कार्तिक वारीतही नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिल्या.

गोरे यांनी केली दर्शन रांगेची पाहणी

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले असून, दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना दर्शन रांग, पत्राशेड येथे मंदिर समितीकडून आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध केल्या जातात. याठिकाणी देण्यात आलेल्या सोयी- सुविधांची पाहणी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. तसेच दर्शनरांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून मोफत अन्नदान सुरू आहे. गोरे यांच्या हस्ते दर्शनरांगेतील भाविकांना अन्नदान करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news