

बामणोली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या मुळगावी दोन दिवसांच्या मुक्कामी आले आहेत. येथे रविवारी शरद पवार गटाचे माळशिरसचे आ. उत्तम जानकर यांनी शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेवेळी अन्य कोणीही त्या खोलीमध्ये उपस्थित नव्हते. या भेटीने चर्चेला उधाण आले आहे.
आ. जानकरांनी पत्रकारांना टाळले
आ. उत्तम जानकर रविवारी ना. एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले तेव्हा त्यांनी पुरेशी गोपनीयता पाळली होती. त्यांनी ना. शिंदेंच्या घरगुती गणपतींचे दर्शन घेतले, चहापान झाले. त्यानंतर दोघे एका स्वतंत्र खोलीमध्ये गेले. या खोलीमध्ये अन्य कुणालाही प्रवेश दिला नाही. सुमारे तासभर खलबते झाल्यानंतर आ. जानकर बाहेर पडले. बाहेर पत्रकार त्यांची वाट पाहात होते. मात्र, पत्रकारांना चुकवत व टाळत त्यांनी गुपचूप जाणे पसंद केले.