

करमाळा : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या कर्मचार्यांच्या बेताळ वागण्याने बसेस जामखेड चौकामध्ये थांबत नसल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दररोज जामखेड आगाराच्या करमाळा- जामखेड व जामखेड- करमाळा अशा फेर्या सुरु आहेत. करमाळा आगाराकडूनही जामखेड आगाराकडे बसेस नियमितपणे जात असतात मात्र जामखेड आगाराचे चालक -वाहक करमाळा शहरातील प्रवासी, विद्यार्थी, वृद्ध, महिला यांना जामखेड चौकात थांबा अधिकृतपणे असताना तसेच बसमध्ये जागा रिकामी असतानाही बसेस थांबवत नाहीत. त्यामुळे या चौकातून नियमित प्रवास करणारे शेकडो प्रवासी या जामखेड आगाराच्या बसेसच्या टिवल्या बावल्या कारभारामुळे प्रवासापासून वंचित राहत आहेत. केवळ चालक वाहकाच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे व जामखेड आगाराचे आर्थिक नुकसान होत आहे.
चालकाने बस थांबवली तर महिला वाहक या डबल बेल मारून पुढे बस नेत आहेत. सतत या ठिकाणी बस मधून चढताना उतरताना वाद होताना दिसत आहेत. या महिला वाहकाच्या बाबत अनेक तक्रारी आगाराकडे करूनही आगारप्रमुख दुर्लक्ष करीत आहेत. अहिल्यानगर व सोलापूरच्या विभाग नियंत्रकांनी प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रवाशांना प्रवास करण्यापासून वंचित ठेवून आगाराचे नुकसान करणार्या चालक वाहकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.