

सोलापूर : होटगी रोडवरील नियोजित आयटी पार्कच्या प्रस्ताव संदर्भात सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
एनटीपीसी कंपनीकडून आयटी पार्कसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध होण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. होटगी येथील नियोजित आयटी पार्कसाठी वीज, रस्ते, पाणी आदी सुविधां पुरविण्यासाठी नियोजन आखण्यात आले असून, त्यासाठी सुमारे 45 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जलसंपदा विभागाच्या सुमारे 50 एकर जागेवर हे आयटी पार्क होत असल्याने त्याचा भूसंपादनासाठी अधिक पैसे लागणार नाहीत. आयटी पार्कमुळे कोणत्याही विमानसेवेला अडथळा येणार नाही. एनटीपीसी किंवा साखर कारखान्यांच्या प्रदूषणाचाही परिणाम आयटी पार्क होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.