Anjana Krishna Ajit Pawar Controversy :
सोलापूर :
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजनी कृष्णा यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बेकायदा मुरूम उपशावर कारवाई करू नये, असे पवारांनी सांगितल्याचा दावा होत असून सोशल मीडियावर नागरिकांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचे सरदार झाले आहेत," अशा शब्दांत कोळी यांनी अजित पवारांना धारेवर धरले.
शरद कोळी म्हणाले, "IPS अंजनी कृष्णा कारवाईसाठी गेल्या होत्या, तेथे तुमचे कार्यकर्ते शासनाची मालमत्ता स्वतःची समजून बेकायदा उपसा करत होते. अशा चोरट्यांची तुम्ही पाठराखण करता आणि अधिकाऱ्यांना दम देता, ही बाब गंभीर आहे. अजित दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात हे विसरू नका."
यानंतर कोळी यांनी थेट बाबा जगताप यांच्यावरही कारवाईची मागणी केली. "जगताप हा गुन्हेगार असून त्याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हे आहेत. तो चरस-गांजा सेवन करतो. अशा व्यक्तीच्या मागे उभे राहणाऱ्या अजित पवारांनी लाज वाटली पाहिजे. माझी मागणी आहे की बाबा जगतापवर एमपीडीए अंतर्गत तात्काळ कारवाई करावी," असे कोळी म्हणाले.
करमाळयाचे डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ बॅनरवर दुग्धभिषेक आंदोलन केल्याप्रकरणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 736 / 2025 महाराष्ट्र अधिनियमकायदेशीर आदेशांचे उल्लंघन करुन उल्लंघन करण्यास प्रोत्साहन केल्याने 1951 चे कलम 135 प्रमाणे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करत नोटीस बजावली आहे.
करमाळयातील कमलाभवानी मंदिरासमोर काल डी वाय एस पी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धभिषेक घालण्यात आला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.