Human Hair Market: आंतरराष्ट्रीय बाजारात मानवी केसांची २५ हजार कोटींची उलाढाल

‘ब्लॅक गोल्ड’ ठरतेय बेस्ट अर्थकारण; प्रतिकिलोस चार हजार रुपयांहून अधिक दर
Human Hair Market
Human Hair Market
Published on
Updated on
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : विंचरताना गळणाऱ्या मानवी केसांचे दर सध्या लक्ष वेधून घेत आहेत. या केसांच्या खरेदी-विक्रीतून आंतरराष्ट्रीय बाजारात दरवर्षी २५ हजार कोटींहून अधिक उलाढाल होत आहे. म्हणून याला ‘ब्लॅक गोल्ड’ही म्हटले जात आहे.

गावोगावी भंगार गोळा करणाऱ्या तरुणांकडून फिरत चारशे रुपये १०० ग्रॅमप्रमाणे मानवी केसांची खरेदी केली जाते. या केसांचा अनेक उद्योगासाठी वापर होतो. कचरा समजल्या जाणाऱ्या या केसांना बाजारात चार हजार रुपये किलोचा दर मिळत असल्याने ती आता ‘ब्लॅक गोल्ड’ झाले आहे.

सलूनमध्ये पुरुषांच्या कटिंग केलेल्या वेस्ट केसांलाही मागणी आहे. पूर्वी सलूनमधील केसांना पंधराशे ते तीन हजार रुपये प्रतिकिलो दर होता. मात्र, तो सध्या वाढून चार हजारांवर गेला आहे. हे दर पाहून लोक आता केस कचऱ्यात फेकून देणे टाळत आहेत. त्या केसांच्या विक्रीतून पैसे मिळत आहेत. गल्लोगल्ली फिरून केस गोळा करणाऱ्यांकडून मोठे व्यापारी केस बल्कमध्ये खरेदी करतात. यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात या केसांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे २५ हजार कोटींहून अधिक रकमेची उलाढाल होत आहे.

मानवी केसांचा असाही उपयोग

पुढारलेल्या विज्ञानामुळे मानवी केसांचे इतर उपयोगही समोर आलेले आहेत. माणसाच्या केसांत केराटिन नावाचे समृद्ध प्रोटिन असते. वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे या टाकाऊ केसांपासून उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खतही बनवले जात असून शेतीसाठीही मानवी केस उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

जागतिक बाजारात वाटा मोठा

जागतिकस्तरावर मानवी केसांच्या बाजारपेठेची उलाढाल अंदाजे ही २५,००० कोटींपेक्षा जास्त होते. भारतात या केसापासून ३,००० ते ५,००० कोटी रुपयांची (सुमारे ५०० ते ७०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) उलाढाल होते. भारतीय मंदिरांमध्ये भाविकांनी केलेल्या केशदानामुळे भारताचा जागतिक बाजारात मोठा वाटा आहे.

केसांचा दर तीस हजारांपर्यंत

लांब आणि चांगल्या केसाला ब्युटी पार्लर व मंदिरांमध्ये मिळणारे लांब, एकाच दिशेचे (Remy/Virgin Hair) केस विग किवा हेअर एक्सटेंशनसाठी वापरले जातात. या केसांचा दर हा १०,००० ते ३०,००० रुपये किवा यापेक्षा अधिक दर प्रतिकिलो असू शकतो.

‘ब्लॅक गोल्ड’ला महत्त्व कशासाठी?

विगसाठी (कृत्रिम केसनिर्मिती) जगभरातून मानवी केसांची मागणी वाढली.

चित्रपटसृष्टी, फॅशन इंडस्ट्री व मॉडेलिंग क्षेत्रासह टक्कल पडलेल्यांकडून केसांना वाढती मागणी.

सिंथेटिक केसांपेक्षा मानवी केसांपासून बनवलेले विग जास्त काळ टिकतात, यामुळेही मागणी.

जागतिक बाजारात भारतीय केसांच्या गुणवत्ता सर्वोच्च असल्याने या केसांना मोठी पसंती.

महिला सौंदर्यासाठी गंगावणाचा (हेअर एक्सटेंशन्स) प्रमाणात वापर करतात, त्यासाठीही मागणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news