

मोहोळ : मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय होण्याची प्रक्रिया शासन पातळीवर सुरू आहे. मात्र, तसा निर्णय झाल्यास मूळ मराठवाड्यातील व शासनाने प्रशासकीय सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ठीत केलेल्या ' त्या ५८ गावांतील ' मराठा समाजावर अन्याय होणार आहे. पूर्वी ही गावे मराठवाड्यातच होती. मात्र, ही गावे 'मराठवाडा मुक्तिदिना' पासून आजही वंचित आहेत.
मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीचे कार्यक्षेत्र हे सध्याच्या मराठवाड्यापुरते मर्यादित आहे. मात्र, यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर मूळ मराठवाड्यातून प्रशासकीय सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आलेला 'त्या ५८ गावांतील ' मराठा समाज आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणार आहे. याबाबत मागील एक वर्षापासून न्या. शिंदे समिती सह जिल्हा प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात येऊनही या गावांचा विचार प्रशासनाने केलेला नाही. मागील ७४ वर्षांत या परिसरातील ५८ गावांना मुक्तिसंग्रमाचा विसर पडलेला आहे.
मराठवाडा मुक्तीसाठी स्थापन झालेल्या मुक्तापूर स्वराज्याची राजधानी असलेल्या जामगाव (ता.माढा) येथील जामगावकर पाटील कुटुंबीयांकडून मात्र मागील १५ वर्षापासून जामगाव (ता.माढा) येथे मुक्तिदिन साजरा करण्यात येतो. मात्र, केवळ जामगाव (ता. माढा) वगळता सोलापूर जिल्ह्यातील इतर ५७ गावांमध्ये मुक्तिदिन साजरा होऊ शकला नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यातील - भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबीदारफळ, शिवणी, नान्नज, मोहितेवाडी व गरलाचीवाडी (गरलाचीवडीया या गावाचा उलगडा अद्याप झालेला नाही.).
बार्शी तालुक्यातील : शेलगाव, श्रीपतपिंपरी, मानेगाव (थो), भोंजे, शेंद्री, वांगरवाडी, इलें, रऊळगाव, मुंगशी (वा.), सासुरे, तावरवाडी, बोरगाव.
माढा तालुक्यातील : अंजनगाव (3),जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरे, बुद्रुकवाडी, पाचफुलेवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई, सुलतानपूर.
मोहोळ तालुक्यातील : आष्टे, पोफळी, विरवडे (खु), चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोपले, एकुरके, मनगोळी, भैरववाडी, वाळूज (दे), देगाव (वा), घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, भोयरे व मसलेचौधरी.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील: वरळेगाव