सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
मागील पाच दिवसांपूर्वी पावसामुळे इंद्रायणीसह अन्य एक्स्प्रेसला तीन ते चार तास उशीर झाल्याची घटना ताजी होती. अशातच सोमवारी (दि. 30) पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस एक तास, तर मुंबई-विशाखापट्टणम एक्स्प्रेस तीन तास उशिराने धावली. परिणामी, दुपारी 1.25 वाजता सोलापूरला पोहोचणारी इंद्रायणी 2 वाजून 18 मिनिटांनी पोहोचली. रेल्वेच्या या घटनेमुळे प्रवासी मात्र वैतागून गेले होते.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सुटणार्या गाड्याच उशिराने धावत आहेत. यामुळे मुंबईतून निघणारी गाडी पुण्यात उशिराने पोहोचली आणि पुण्यातून ही गाडी सकाळी 9.30 वाजता निघते. परंतु, 10.41 वाजता सुटल्यामुळे सोलापूरला पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे सोलापूरला पोहोचण्यासाठी सव्वादोन वाजून गेले होते. सध्या रेल्वेगाड्या कोणत्या ना कोणत्या कारणाने उशिरा धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी सोलापूर रेल्वेस्थानकात तासन्तास गाडीची वाट पाहत थांबण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
पुणे-सोलापूर इंद्रायणी ही सकाळी पुण्यातून निघून दुपारी 1.25 वाजता सोलापूरला पोहचते; तर सोलापूरहून पुन्हा दोन वाजता पुण्याकडे निघते; परंतु सोमवारी पुण्यातून निघायला एक तास 11 मिनिटे उशीर झाल्यामुळे ती सोलापूरला दुपारी 1.25 ऐवजी दुपारी दोन वाजून 18 मिनिटांनी पोहोचली, तर पुण्याकडे निघायला दुपारी 2.50 वाजले. रात्री पावणेसात वाजेदरम्यान ती पुण्यात पोहोचली.