

सोलापूर : अंध महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूरच्या गंगा संभाजी कदम हिची भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. गंगाच्या निवडीमुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे. दरम्यान, कर्नाटकची दीपिका टी. सी. ही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
सोलापुरातील उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव, संतोष भंडारी, मुख्याध्यापक प्रकाश दर्शणाळे यांनी तिचे अभिनंदन केले. येथील जामश्री इलिजीअयम क्रिकेट क्लब दमाणीनगर येथे प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगा कदम क्रिकेटचा सराव करत आहे.
8 बहिणी आणि एक भाऊ...
शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या गंगा संभाजी कदम हिला एकूण 8 बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. गंगा हिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीचीआहे. परिस्थितीशी लढा देऊन गंगा कदम हिने हे यश प्राप्त केले आहे.
सोलापूर-मुंबईत शिक्षण
सोलापूर येथील भैरुरतन दमाणी या निवासी अंध शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील मुले क्रिकेट खेळत असलेली पाहुन तिलाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्यानंतर गंगाचे उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील हरीभाई देवकरण येथे तर मुंबई येथील कीर्ती कॉलेजमध्ये कला विभागात तिने पदवी प्राप्त केली.
शालेय वयापासूनच क्रिकेटचे वेड
शाळेत असतानाच गंगाने क्रिकेट शिकण्याचा हट्ट धरला होता. इयत्ता सातवीत असल्यापासून तिने क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली. ती क्रिकेट मन लावून आणि जिद्दीने शिकली. सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या अंध महिलांच्या पहिल्या क्रिकेट स्पधेमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघातून सोलापूरच्या एकूण 6 मुली सहभागी होत्या. त्यात गंगाचा समावेश होता. गंगा या स्पर्धेत प्लेयर ऑफ द सीरीज ठरली होती. तेव्हापासून आजतागायत ती महाराष्ट्र राज्य अंध महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.
11 नोव्हेंबरपासून स्पर्धा
विश्वचषकातील हे सामने 11 ते 25 नोव्हेंबर 2025 या दरम्यान दिल्ली, बेंगलोर व काठमांडू (नेपाळ) येथे होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, अमेरिका (युएसए), पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळ या सात देशांचे संघ सहभागी होणार आहेत.